बघ्यांची होतेय गर्दी ; या भागातील दुर्मिळ व पहिलीच घटना
सावंतवाडी : प्रतिनिधी
मडुरा परबवाडी येथील पशुपालक शांताराम नार्वेकर यांच्या गौरी नावाच्या गायीने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. एकाच वेळी दोन वासरांना जन्म देणारी ही या भागातील दुर्मिळ व पहिलीच घटना असल्याचे पशुपालकांनी सांगितले. दरम्यान मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी रवी पेडणेकर यांनी गायीसह वासरांची पाहणी करून वासरे व गाय सुखरूप असल्याचे सांगितले.
आठ दिवसांपूर्वी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गौरी गायीने दोन गोंडस वासरांना जन्म दिला. घटनेची बातमी वाऱ्यासारखी मडुरा पंचक्रोशीत पसरली . आणि बघ्यांची गर्दी झाली. गौरी गायीची जर्सी गायीला क्रॉस असून दिवसाला सात ते आठ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. शांताराम नार्वेकर हे शेती व्यवसायासोबत पशुपालनही करतात. गौरीची दोन्ही वासरे एकाच रंगाची एक सारखीच दिसतात.
मडुरा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शांताराम नार्वेकर यांच्या गायीला 70 टक्के जरशीची कृत्रिम रेतन लस देण्यात आली होती आणि ती यशस्वी झाल्याचे कर्मचारी रवी पेडणेकर यांनी सांगितले. मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनीही वासरांची पाहणी केली.









