वार्ताहर /केपे
शेल्डे, केपे येथील श्नी सातेरी शांतादुर्गा देवीचा महाजत्रोत्सव 30 जानेवारीपासून साजरा करण्यात येत असून 10 फेब्रुवारी रोजी त्याचा समारोप होणार आहे. 12 वर्षांनी 12 दिवस हा जत्रोत्सव साजरा केला जातो. दहाव्या दिवशी म्हणजे आज 8 रोजी या उत्सवात रात्री 9 वा. गौरव सोहळा होणार असून यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश क्राबाल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, इतर आमदार व जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई हे पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
शेल्डे येथील श्नी सातेरी शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव बारा वर्षांनी साजरा करण्याची परंपरा असून ही जत्रा सर्व गोमंतकीयांकरिता आकर्षणाचा विषय असते. या उत्सवात मोठय़ा प्रमाणात भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते. 30 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाजत्रोत्सवात आतापर्यंत विविध धार्मिक विधींबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही झाले आहेत. आज 8 रोजी महाजत्रोत्सवाचा दहावा दिवस असून सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती, प्रसाद, संध्या. 7 वा पुराण, पूजा, आरती, पालखी मिरवणूक, प्रसाद व भोवर आणि त्यानंतर रात्री 9 वा. मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्याचा सोहळा होईल.
अकराव्या दिवशी 9 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती, रात्री पुराण, पूजा, पालखी मिरवणूक, प्रसाद, भोवर, रात्री 11 वा. ऑर्केस्ट्रा, त्यानंतर जागर, पहाटे 3.30 वा. दिवजोत्सव, तर बाराव्या दिवशी 10 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा. आरती, प्रसाद, रात्री पुराण, पूजा, आरती, पालखी मिरवणूक व प्रसाद होईल. त्यानंतर महाजागर होऊन म्हारांगणात दीड सवंगाच्या जागराने बारा दिवसांच्या या जत्रोत्सवाची सांगता होईल.









