पारंपरिक पद्धतीने ग्रामीण भागातील गाणी म्हणत केले गौराईचे स्वागत : मनोभावे केले पूजन
वार्ताहर /किणये
आली हो आली सोनपावलांनी गौराई आली…. या पारंपरिक गीतांच्या स्वरात रविवारी बेळगाव तालुक्यात गौराईचे घराघरात उत्साहात आगमन झाले. ग्रामीण भागात गौराईचे स्वागत करण्याची अनोखी परंपरा आहे. ती आजही जपताना महिला दिसत होत्या. गौराईचे आगमन होणार असल्यामुळे महिलांनी रविवारी सकाळीच आपापल्या घरासमोर आकर्षक अशा रांगोळ्या घातल्या होत्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. विविध प्रकारचे पारंपरिक व ग्रामीण भागातील गाणी म्हणत गौराईचे स्वागत करण्यात येत होते. गौराई पूजनासाठी महिलांनी कूपनलिका, विहिरीजवळ, तलाव, नदी या ठिकाणी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक व आरती केली.
सुवासिनी महिला एकमेकांना हळदीकुंकू करताना दिसत होत्या. तर गौराईला घरी आणून गणरायासमोर पूजन करण्यात आले. पूजेवेळी पुरणपोळी, विविध पक्वान्नांचे नैवेद्य करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी आपापल्या घरात आकर्षक अशी सजावट करून गणपती बाप्पाचे स्वागत केलेले आहे. घरगुती गणेशमूर्तीसमोर हे विविध प्रकारचे हलते देखावे, विविध मंदिरांच्या प्रतिकृती सादर करण्यात आलेल्या आहेत. गावागावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. रविवारी गौराईचे आगमन झाल्यामुळे भक्तांमध्ये व महिला वर्गांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. गौराईच्या पूजन सोहळ्यात घरातील सारेच सदस्य सहभागी झाले होते. कारण गौराई पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून स्त्राr शक्तीचे प्रतीक म्हणूनही या सणाला विशेष महत्त्व आहे. रविवारी विविध गावातील अनेकांच्या घरातील महिला, तरुणींनी पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन केले.









