अँड्रीव्हा, जेनिक सिनर, लॉरेन्झो मुसेटी, बुबलिक यांचेही विजय, सिलिक पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
माजी विजेत्या अमेरिकेच्या कोको गॉफने अमेरिकन ओपन मोहिमेची विजयी सुरुवात करताना बिगरमानांकित अॅला टोमलानोविचचा पराभव केला. याशिवाय पोलंडची इगा स्वायटेक, डोना व्हेकिक, जपानची नाओमी ओसाका, मायरा अँड्रीव्हा, अमांदा अॅनिसिमोव्हा, जेनिक सिनर, लॉरेन्झो मुसेटी, अलेक्झांडर बुबलिक यांनीही दुसरी फेरी गाठली. मारिन सिलिकचे आव्हान मात्र पहिल्या फेरीतच समाप्त झाले.
महिला एकेरीत माजी चॅम्पियन असणाऱ्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफने अॅला टोमलानोविचविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळविला. गॉफने पहिला सेट जिंकल्यानंतर टोमलानोविचने टायब्रेकरपर्यंत लांबलेला दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्येही दोघींत बराच संघर्ष झाला. पण अखेर गॉफने ही लढत 6-4, 6-7 (2-7), 7-5 अशी जिंकून दुसरी फेरी गाठली. 2023 मध्ये गॉफने ही स्पर्धा जिंकली होती तर टोमलानोविचने 2022 मधील स्पर्धेत सेरेना विल्यम्सला तीन सेट्सच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला होता. दुसऱ्या फेरीत तिचा मुकाबला ऑलिम्पिक रौप्यविजेत्या डोना व्हेकिकशी होईल. व्हेकिकने जेसिका बुझास मॅनीरोवर 3-6, 7-5, 6-3 अशी मात केली.
स्वायटेकचा विजयी प्रारंभ
विम्बल्डन विजेत्या इगा स्वायटेकने दुसरी फेरी गाठताना एमिलियाना अॅरॅन्गोवर 6-1, 6-2 असा सहज विजय मिळविला. तिची पुढील लढत नेदरलँड्सच्या सुझान लामेन्सशी होईल. जपानच्या नाओमी ओसाकानेही दुसरी फेरी गाठताना बेल्जियमच्या ग्रीट मिनेनचा 6-3, 6-4 असा पराभव केला. 83 मिनिटांत तिने हा सामना संपवला. ओसाकाने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकेच्या आठव्या मानांकित अमांदा अॅनिसिमोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या किम्बर्ली बिरेलचा 6-3, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. प्रतिभावान टेनिसपटू मायरा अँड्रीव्हाने अॅलिसिया पार्क्सचा 6-0, 6-1 असा धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत विद्यमान चॅम्पियन इटलीच्या जेनिक सिनरने झेक प्रजासत्ताकच्या विट कोप्रिव्हाचा 6-1, 6-1, 6-2 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपीरिनशी होईल. सिनरने आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. पॉपीरिनने फिनलँडच्या एमिल रुसुव्होरीवर 6-3, 6-4, 7-6 (7-3) अशी मात केली अन्य एका सामन्यात क्रोएशियाच्या माजी विजेत्या मारिन सिलिकला पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली. 23 व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकने त्याला 6-4, 6-1, 6-4 असे हरविले. इटलीच्या दहाव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने एका सेटची पिछाडी भरून काढत फ्रान्सच्या जिओवानी एम्पेत्शी पेरिकार्डवर 6-7 (3-7), 6-3, 6-4, 6-4 असा विजय मिळविला.
महिला दुहेरीत व्हीनस लैलासह खेळणार
महिला एकेरीत वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या 45 वर्षीय व्हीनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र ती आता महिला दुहेरीत 2021 मध्ये एकेरीची अंतिम फेरी गाठलेल्या लैला फर्नांडेझसमवेत खेळणार आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच व्हीनसने ग्रँडस्लॅम स्पर्धेत भाग घेतला आहे. गेल्या आठवड्यात तिने मिश्र दुहेरीत भाग घेतला होता. यापूर्वी तिने धाकटी बहीण सेरेना विल्यम्ससमवेत महिला दुहेरीची 7 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. त्यापैकी दोनदा अमेरिकन स्पर्धेतील आहेत. येथील दुहेरीत व्हीनस-लैला यांची पहिली लढत सहाव्या मानांकित युकेनची ल्युडमिला किचेनॉक व ऑस्ट्रेलियाची एलेन पेरेझ या जोडीशी होणार आहे.









