प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयाच्या नूतन इमारतीचे शनिवारी उद्घाटन असल्यामुळे त्याची जोमात तयारी सुरू आहे. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे कामही जोमात सुरू आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसत होती.
शनिवारी जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी आता न्यायालयीन इमारतीच्यासमोर मंडप उभा करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारीच वाहनांवर प्रवेशबंदी घालण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. यातच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळेही या परिसरात मोठी अडचण निर्माण झाली होती.
वाहने पार्किंग कोठे करायची? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. वकील, पक्षकारांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. वास्तविक जेएमएफसीच्या न्यायालयात वकील तसेच पक्षकारांना पार्किंगसाठी जागा देणे गरजेचे होते. मात्र उद्घाटन होणार असल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. शनिवारीही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे समस्या वारंवार निर्माण होत आहे. मागील दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली आहे. मात्र ते काम अजूनही अर्धवट आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला तातडीने काम पूर्ण करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी होत आहे.









