सांकवाळ झुआरीनगर येथील भारत पेट्रोलियम गॅस गोदामावर पोलिसांचा छापा,
प्रतिनिधी/ वास्को
सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील भारत पेट्रोलियम गॅस एजन्सीच्या गोदामावर छापा मारून वेर्णा पोलिसांनी स्वयंपाक गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला. भरलेल्या सिलिंडरमधील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्यात येत होता. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. हा काळाबाजार बऱ्याच काळापासून होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केलेली असून अनेक सिलिंडर ताब्यात घेण्यात आलेले आहेत. या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या या गोदामात सिलिंडरमधील गॅस चोरण्याचा प्रकार होत असल्याची माहिती त्यांना काहीं लोकांकडून मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने पहाटेच्यावेळी या गोदामावर छापा टाकला. सहा कामगार या गॅस गोदामात होते. त्यांच्याकडून भरलेल्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. तर एक जण पोलीस कारवाईच्या भीतीने पळून गेला. पोलिसांनी पाच कामगारांना अटक केलेली असून सर्वजण परप्रांतीय युवक आहेत. हे कामगार विशिष्ट नळीचा वापर करून प्रत्येक सिलिंडरमधील दोन ते तीन किलो गॅस चोरून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत होते. सिलिंडरचे सील न तोडता व्यवस्थितपणे ही चोरी होत असे. हा गॅस नंतर काळ्याबाजारात विकला जात असे. हा काळा बाजार बऱ्याच काळापासून चालत आला असण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झुआरीनगर व जवळपासच्या भागात नागरिकांना सतत कमी वजनाचे गॅस सिलिंडर मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरगुती गॅस अगदी कमी दिवसांत संपत असल्याने या भागात काही वेळा पती-पत्नींमध्ये घरात वाद निर्माण होत असत. त्यामुळे काहींना गॅस एजन्सीकडून कमी वजनाचे सिलिंडर मिळत असल्याचा संशय आला होता. या संशयाची खातरजमा करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी झुआरीनगर वसाहतीमध्ये लोकांनी सिलिंडरचे वजन करून पाहिले असता अनेक सिलिंडर कमी वजनाचे असल्याचे स्पष्ट झाले होते. लोक संतप्त बनल्याने सिलिंडर वितरण करणारे कामगार त्यावेळी पळून गेले होते. त्यामुळेच सिलिंडरमधील गॅस चोरण्याचा हा प्रकार बऱ्याच काळापासून चालत आलेले आहे, असा नागरिकांना संशय आहे. त्यातूनच पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली व ही धडक कारवाई झाली.
एजन्सी मालकाचे कानावर हात?
अधिक माहितीनुसार, हा प्रकार या गोदामात आठवड्यातून दोन ते तीन वेळा होत असे. प्रत्येक वेळी वीस ते पंचवीस सिलिंडरमधून गॅस काढला जात असे. या प्रकारासंबंधी आपल्याला कसलीच माहिती नसल्याचे संबंधित एजन्सीच्या मालकाने म्हटले आहे. तसेच लोकांनी गॅस सिलिंडर स्वीकारताना त्या सिलिंडरच्या वजनाची खातरजमा करूनच स्वीकारावा, अशी विनंती केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्रीही चालू होती. प्रत्येक सिंलिडरचे वजन करण्यात येत होते. अनेक सिलिंडर या कारवाईत जप्त करण्यात आलेले आहेत. वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.









