सांगली :
कुपवाड शहरातील बसंतनगर परिसरातील नागरिक सध्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे महापालिकेच्या नागरी सुविधा विभागातील दुर्लक्ष आणि संबंधित कंत्राटदारांची मनमानी. नागरिकांचा मुख्य संपर्क रस्ता जो स्वाती गॅस, शंभर फुटी रोड ते सूतगिरणीमार्गे माधवनगरकडे जातो. त्या रोडला जोडणारा वसंतनगरमधील म्हसोबा मंदिर मार्गे जाणारा रोड तो सध्या धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्याची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून सतत ढासळत चालली आहे. या समस्येकडे कोणीच लक्ष देत नाही. नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प, सहा महिने ठेकेदार गंडवतोय, अधिकारी मान डोलवतोय अशी जनतेची तक्रार आहे.
डिसेंबर महिन्यात या रस्त्यावर ड्रेनेजचे काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कारण हे काम पूर्ण झाल्यावर रस्ता सुधारेल, अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात झाले याच्या अगदी उलट, ठेकेदाराने ड्रेनेजचे काम अर्धवट ठेवले आणि रस्ता पूर्ववत करण्याऐवजी पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला, चिखलयुक्त आणि बाहतुकीस अयोग्य स्थितीत सोडून दिला. नागरिकांनी तक्रारी केल्या, परंतु कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
या अर्धवट ड्रेनेज कामाचा त्रास चालू असतानाच आता गॅस पाईपलाइनचे नवीन काम सुरु झाले. नागरिकांना बाटले की एकदाचे रस्त्याचे काम पूर्ण होईल, पण दुर्दैवाने या नवीन ठेकेदाराने देखील हाच पवित्रा घेतला. काही भागांत पाईपलाइनसाठी रस्ता उकरून खोदकाम करण्यात आले आणि नंतर ते तसेच सोडले गेले. खोदलेली माती रस्त्यावरच पडून आहे. खड्डे भरलेले नाहीत आणि त्यामुळे चालणे तर सोडाच, वाहन चालवणेही जीवघेणे झाले आहे.
या दुहेरी अडचणींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांना घरात जाण्यासाठी देखील अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवरून पाणी साधून होतो. चिखल वाहन घसरून अपघात होण्याचा धोका बाढतो. विद्यार्थी, महिला, वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांगांना या अडथळ्यांमुळे रोजच्या जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही हे अत्यंत चिंताजनक आहे. महापालिकेचे संबंधित अधिकारी ना जागेवर तपासणी करतात, ना ठेकेदारांना काम पूर्ण करण्याचे आदेश देतात. ठेकेदारांकडून काम अर्धवट ठेवले गेले तरी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे अश्वम्य दुर्लभ आणि ढिसाळ नियोजन उघड होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी स्वतःच रस्त्यावर उभे राहून खड्ड्यांमध्ये दगड टाकून चालण्याजोगा मार्ग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी सामाजिक माध्यमांवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कोणतीही ठोस हालचाल होताना दिसत नाही.
कुपवाडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात नागरी सुविधांची ही दयनीय अवस्था अत्यंत खेदजनक आहे. रस्ते हे कोणत्याही शहराच्या विकासाचा कणा असतात. जर असेच काम अर्धवट आणि बेपर्वाईने चालत राहिले, तर नागरिकांच्या जीवनमानाबर याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
महापालिकेने याची गंभीर दखल घेऊन दोन्ही ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी आणि त्वरित रस्ता दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, हीच जनतेची मागणी आहे








