कुटुंबातील चौघेजण जखमी : दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक
प्रतिनिधी/ बेळगाव
गॅस सिलिंडरमधील गळतीने आगीचा भडका उडून एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी सुभाष गल्ली, गांधीनगर येथे ही घटना घडली असून परिवहन मंडळाचा बसचालक, त्याची पत्नी व दोन मुले या घटनेत गंभीर जखमी झाली आहेत.
मंजुनाथ नरसाप्पा अथणी (वय 40), त्यांची पत्नी लक्ष्मी मंजुनाथ अथणी (वय 36), मुलगी वैष्णवी (वय 13), मुलगा साईकुमार (वय 10) अशी जखमींची नावे असून त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मंजुनाथ हे परिवहन मंडळाचे बसचालक आहेत. ते मूळचे सौंदत्ती तालुक्यातील कुरवीनकोप्पचे. सध्या नोकरीनिमित्त सुभाष गल्ली, जुने गांधीनगर येथे कुटुंबीयांसह त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी सकाळी त्यांना कामावर जायची घाई होती. त्यावेळी गॅस पेटविताना आगीचा भडका उडून घरातील वस्तूंनी पेट घेतला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चौघाजणांना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथून खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन ही घटना नेमकी कशामुळे घडली? याचा आढावा घेतला.









