अन्यथा कारवाई : वितरकांकडून ई-केवायसी
बेळगाव : गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या गॅस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. त्यामुळे गॅस वितरणाची प्रक्रियाही सुरळीतपणे चालणार आहे. उर्वरित गॅस ग्राहकांची ई-केवायसी केली जात आहे. दरम्यान ज्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांनी करून घ्यावी, असे आवाहनही गॅस एजन्सीने केले आहे. गॅस वितरणात सुरळीतपणा आणण्यासाठी गॅस ई-केवायसी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया घरोघरी वितरकांमार्फत राबविली जात आहे. ग्राहकाच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. मात्र काही घरांमध्ये ग्राहक नसल्यामुळे प्रक्रियेत अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे 100 टक्के ई-केवायसीचे उद्दिष्ट अपुरे राहिले आहे.
तर काही ठिकाणी नेटवर्क आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे प्रक्रियेला उशीर होऊ लागला आहे. शहर आणि ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र आतापर्यंत गॅस ई-केवायसीची 80 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरितांसाठी ई केवायसी सुरू आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कार्डधारकांना 300 रुपये सबसिडी दिली जात आहे. अशा ग्राहकांनाही ई-केवायसी बंधनकारक आहे. मात्र काही ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. प्रारंभी गॅस कंपन्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. मात्र आता घरोघरी वितरकांकडून गॅस ई-केवायसी केली जात आहे. त्याबरोबर आता मोबाईलवरही ही प्रक्रिया सुरू केली आहे.









