घटनेनंतर रसायन, गॅस लिकेजमुळे प्रवासी, नागरिकांची उडाली धावपळ , तीव्र उतारावरुन कंटेनर काजळी नदीपात्रात कोसळला, रत्नागिरी ते गोव्याच्या दिशेने निघाला होता कंटेनर
प्रतिनिधी/लांजा
रत्नागिरी-जयगड ते गोव्याच्या दिशेने गॅस घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी होऊन कंटेनर 30 फुट खोल काजळी नदीपात्रात कोसळला. चालक केबिनमध्ये अडकल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 3 च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अंजणारी काजळी नदी पुलावर घडली.
प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) असे ठार झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. काजळी नदीपात्रात कंटेनर कोसळल्यानंतर रसायन वाहू लागल्याने व गॅस लिकेज झाल्याने प्रवाशी व नागरिकांची धावपळ उडाली. रसायन लिकेजमुळे अनुचित प्रकार घडू नये व मदतकार्य करण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी पोलीस व नागरिक धावून गेले. रत्नागिरी येथील एका गॅस कंपनीतून गोव्याच्या दिशेने कंटेनर (एम. एच. 12 आर. टी. 6488) रसायन घेऊन निघाला होता. कंटेनर अंजणारी घाटाच्या तीव्र उतारावर आला असता भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला वा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर काजळी नदीपात्रात कोसळला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरूवारी दुपारी 3 च्या दरम्यान कंटेनर अंजणारी घाटातून गोव्याकडे निघाला होता. भरधाव असल्याने कंटेनरने महामार्गाच्या बाजूची बॅरीकेटस् तोडून कंटेनर नदीत कोसळला. काजळी नदीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने व कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून पडल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी अग्निशामक गाड्याही दाखल नदीच्या पाण्यात कंटेनरमधील रसायन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होते. या घटनेची माहिती मिळताच लांजा, हातखंबा पोलीस अंजणारी येथे घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रातून कंटेनर बाहेर काढण्याचे प्रयत्न गुरूवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी अग्निशामक गाड्याही दाखल झाल्या होत्या. खबरदारी म्हणून अंजणारी परिसरातील वीज पुरवठाही बंद करण्यात आला आहे.