वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडचे माजी प्रमुख क्रिकेट प्रशिक्षक गॅरी स्टीड यांचे आता न्यूझीलंडच्या प्रशिक्षक चमुमध्ये दर्जेदार कामगिरी प्रशिक्षक म्हणून पुनरागमन झाले आहे. सदर माहिती क्रिकेट न्यूझीलंडने शुक्रवारी दिली आहे.
न्यूझीलंड संघातील प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षक विकासाची जबाबदारी गॅरी स्टीड यांच्यावर राहील. तसेच संघाच्या उच्च कामगिरी कार्यक्रमाचे ते प्रमुख सुत्रधार राहतील. स्टीड यांचे केवळ 4 महिन्यांच्या कालावधीतच न्यूझीलंडच्या प्रशिक्षक चमुमध्ये पुनरागमन झाले आहे. गेल्या जूनमध्ये स्टीड यांनी न्यूझीलंडच्या पुरूष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडली होती. 2018 ते 2025 या सात वर्षांच्या कालावधीत स्टीड न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड क्रिकेट संघाने 2019 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच 2021 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि 2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. 2019-21 या कालावधीत झालेल्या आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या न्यूझीलंड संघाला स्टीड यांचे मार्गदर्शन लाभले होते.









