वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक गॅरी स्टीड यांची आंध्र प्रदेशच्या रणजी संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2025-26 च्या रणजी हंगामासाठी आंध्रच्या रणजी संघाला स्टीड यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती आंध्र क्रिकेट संघटनेने दिली आहे.
2018 ते 2025 या कालावधीत गॅरी स्टीड यांनी न्यूझीलंड संघाचे एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून कारकीर्द बजावली. त्यांनी आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघाला तीन वेळेला अंतिम फेरीत नेले. 2019 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच 2021 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि 2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. स्टीड यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने 2019-21 च्या कालावधीत आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकताना भारताचा पराभव केला होता. 53 वर्षीय गॅरी स्टीड यांनी न्यूझीलंडच्या महिला संघालाही बहुमोल मार्गदर्शन केले आहे.









