वृत्तसंस्था/ बुलावायो
यजमान झिंबाब्वे आणि विंडीज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर गॅरी बॅलेन्सच्या शानदार नाबाद शतकामुळे झिंबाब्वेने पहिल्या डावात 9 बाद 341 धावा जमवल्या. तत्पुर्वी विंडीजने आपल्या पहिला डाव 6 बाद 447 धावावर घोषित केला होता. बॅलेन्स 118 धावांवर खेळत असून इनोसंट केया, ब्रेन्डॉन मेहुता यांनी अर्धशतके झळकविली.
झिंबाब्वेने 3 बाद 115 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. नाबाद राहिलेला केया जोसेफच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 9 चौकारासह 67 धावा जमवल्या. इव्हान्स आणि सिगा हे दोन फलंदाज पाठोपाठ बाद झाले. वेलिंग्टन मासाकेझा सातव्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. झिंबाब्वेची यावेळी स्थिती 7 बाद 192 अशी होती. दरम्यान बॅलेन्स आणि मेहुता यांनी संघाचा डाव सावरताना आठव्या गडय़ासाठी 135 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. होल्डरने मेहुताचा त्रिफळा उडवला. त्याने 9 चौकारासह 56 धावा जमवल्या. मात्र एका बाजूने बॅलेन्सने संघाला बऱयापैकी स्थितीत नेताना दिवसअखेर 211 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारासह 118 धावापर्यंत मजल मारली. नेयुचीने 13 धावा जमवल्या. झिंबाब्वेचा संघ अद्याप 106 धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून ही कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे. विंडीजतर्फे अलझेरी जोसेफने 75 धावात 3 तर मॉटी आणि होल्डर यांनी प्रत्येकी 2 तसेच रॉच व ब्रेथवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज पहिला डाव 143 षटकांत 6 बाद 447 डाव घोषित ब्रेथवेट 182, चंदरपॉल नाबाद 207, मेयर्स 20, रीफर 2, ब्लॅकवूड 5, चेस 7, होल्डर 11, दा सिल्वा नाबाद 3, अवांतर 10. गोलंदाजी ः ब्रँडन मवुता 5-140, मासाकेझा 1-85.
झिम्बाब्वे ः 119 षटकांत 9 बाद 341 ः (इनोसंट काइया 67, तनुनुरवा माकोनी 33, छिबाबा 9, क्रेग एर्विन 13, बॅलेन्सी खेळत आहे 118, सिगा 2, इव्हान्स 7, मासाकेझा 15, मेहुता 56, नेयुची 13, . गोलंदाजी ः जोसेफ 3-75, गुडाकेश मोती 2-97, ब्रेथवेट 1-7, रॉच 1-33, होल्डर 2-49).









