येळ्ळूर शिवारातील कोटुंमभाव- मजगावातील बक्काप्पा देवाला अभिषेक घालून साकडे : महाप्रसादाचेही वाटप
बेळगाव : अनगोळ येथील शेतकऱ्यांनी पाऊस पडावा यासाठी येळ्ळूर शिवारातील कोटुंमभाव येथे जाऊन पावसासाठी देवाकडे गाऱ्हाणे घातले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी देवाकडे गाऱ्हाणे घातले. अनगोळ येथील रयत बांधवांनी सकाळी ग्रामदेवता कलमेश्वर मंदिर येथे विधिवत पूजा, अर्चा करून देवाला पालखीत बसवून वाजतगाजत करलदंड मार्गाने अनगोळ, येळ्ळूर सीमेवर असलेल्या कोटुंमभाव येथे देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. तत्पूर्वी सकाळी राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक घालण्यात आला. नारळ वाढवून पूजा केली. तेथील पाणी आणून देवाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवाला नैवैद्य दाखवून यंदा लवकर पाऊस पडू दे, गावात शांतता नांदू दे, जनावरांना चारा उपलब्ध होवू दे, याचबरोबर जनावरांबरोबर साऱ्यांचे आरोग्य चांगले राहू दे, तरुण, व्यवसायिक, कष्टकरी कामगार, महिला यांना देखील चांगले आरोग्य लाभू दे, अशी मागणी देवाकडे करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व शेतकरी बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गावातील व्यापारी, शेतकरी, युवक, पंच कमिटी, देवस्थान पंच कमिटी, हक्कदार मोट्या संख्येने उपस्थित होते.
मजगाव
बेळगाव : मजगावच्या शेतकऱ्यांनी ग्रामदैवत श्री क्षेत्र बक्काप्पा देवाकडे मोठ्या पावसासाठी 19 रोजी साकडे घातले. देवस्थान खादरवाडी व पिरनवाडी गावच्या पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी आहे. यावर्षीही भातपेरणी झाल्यानंतर मजगावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने बैलगाड्या, ट्रॅक्टर्स, रिक्षा, टेंम्पो, दुचाकीवरून जाऊन देवस्थानला भेट देवून पावसासाठी साकडे घालून ग्रामस्थांतर्फे गाऱ्हाणे घातले. यावेळी मजगावात कटबंद वार पाळणूक करून शेतकरी सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते. मजगाव देवस्थान कमिटी व गाव पंचकमिटीचे सर्व सदस्य, शेतकरी व महिला अबालवृद्धासह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. कुडची होते. यावेळी सर्व नागरिकांतर्फे नंदकुमार मजुकर यानी सदर क्षेत्राचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवाजी पट्टण यानी विचार मांडले. पंचप्रमुख बी. डी. कुडची यानी सदर क्षेत्रासाठी दहा एकर जागा राखून ठेवण्याची मागणी शासनाकडे केली. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









