वातावरणातील सततच्या बदलामुळे अवकाळी पावसाने आंबा, काजू या प्रमुख पिकांसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मासेमारीवरही मोठा परिणाम झाला असून कोकणातील फलोत्पादन आणि मासेमारी उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी बागायतदार आणि मच्छीमार आर्थिक दुष्टचक्रात अडकला आहे.
कोकणातील जनतेला मागील चार-पाच वर्षांपासून वेगवेगळय़ा नैसर्गिक आपत्तींना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. तोक्ते चक्रीवादळ, फयान वादळ यासारख्या चक्रीवादळांमुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून त्याचा मत्स्योत्पादनावरही परिणाम झाला आहे. तर वातावरणातील बदलांमुळे फळ पिकांवर परिणाम झाला आहे. सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, गारपिट आणि पूर्व मोसमी पावसामुळे कोकणची ओळख बनलेला आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभुळ यासह विविध फळपिक उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे अर्थकारण कोलमडले असून बागायतदार आर्थिक दुष्टचक्रात अडकला आहे. हजारो हेक्टरवर लागवड केलेल्या फळपिकांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे मच्छीमारांना मासेमारी करताना सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे.
शासनाने 100 टक्के अनुदानावर राबवलेली योजना आणि दापोली कृषी विद्यापीठाने विविध फळपिकांच्या कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱया जाती निर्माण केल्यामुळे 1990 नंतर क्रांतीकारक फळझाड लागवड झाली. आंबा, काजू पिकांखाली क्षेत्र हजारो हेक्टरनी वाढले. याशिवाय कोकम, सुपारीचे क्षेत्र वाढले. अलीकडे जांभळासारख्या फळपिकांची कलमे तयार करण्यात आली असून आता त्याचीही लागवड होऊ लागली आहे. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱयाने व्यावसायिक आंबा, काजू लागवडीवर भर दिला. आंबा पिकापासून शेतकऱयांची आर्थिक उन्नती झाली, तर काजू पिकापासून अनेक शेतकरी स्थिरस्थावर झाले. त्यामुळे कोकणातील शेतकरी बागायतदार फलोत्पादनातून स्थिरस्थावर होत असताना ऋतूचक्र बदलू लागल्याने फळझाड लागवड करणे आता धोक्याचे ठरू लागले आहे.
फळपिकांच्या दृष्टीने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू खूप महत्वाचे आहेत. परंतु, गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऋतूचक्रच बदलत असल्याचे समोर येत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊस आता कधी नोव्हेंबर, तर मागच्यावर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होता. त्यानंतर जानेवारीपासूनच्या पुढील महिन्यातसुद्धा प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस सुरुच आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे थंडीचे महिने. परंतु, अलिकडे काही मोजकेच दिवस थंडी जाणवली. तापमान वाढीमुळे उन्हाळा कधी सुरू होतो आणि कधी संपतो, हे समजेनासे झाले आहे. त्यामुळे ऋतुचक्र बदलाचा सर्वाधिक फटका फळपिकांना बसत आहे.
मागील तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने सुरू केलेला पाठलाग यावर्षी देखील कायम आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने पाठ सोडलेली नाही. त्यानंतर जानेवारी वगळता प्रत्येक महिन्यात पाऊस झाला असून ऐन हंगामात 4 ते 10 एप्रिल या कालावधीत जोरदार पाऊस झाला. वादळाने तर हाहाकार उडवला. त्यामुळे आंबा, काजू व इतर पिकांची फळ गळती होऊन त्यामध्ये मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले आंबा, काजूचे पिक अक्षरशः वाया गेले. शेतकऱयांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली.
बदलत्या वातावरणामुळे किड रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फुल किडे, तुडतुडे, फळमाशी, बुरशी यासारख्या किड रोगांचा प्रादुर्भाव गेल्या तीन-चार वर्षांत वाढला आहे. त्यामुळे बागांचे व्यवस्थापन करणे शेतकऱयांना कठीण बनत चालले आहे. कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण यामुळे नेमके काय करावे, हेच शेतकऱयांना समजेनासे झाले आहे. परिणामी उत्पादनावर परिणाम होत असून मागील तीन वर्षांत सरासरीच्या 30 ते 35 टक्के आंबा व काजू उत्पादन शेतकऱयांना मिळाले. उर्वरित 65 ते 70 टक्के उत्पादन सततच्या वातावरणातील बदलांमुळे वाया गेले आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांत दहा ते वीस गुंठय़ांबरोबरच हेक्टर क्षेत्रामध्येही आंबा, काजू लागवड केली आहे. या आंबा, काजू बागांना अक्षरशः लहान मुलाप्रमाणे शेतकरीवर्ग जपतो आणि देखभाल करीत असतो. परंतु, वातावरणातील बदलांमुळे फळपिकांचे होत असलेले नुकसान पाहता या फळबागांचे पुढे करायचे काय, असा प्रश्न आता बागायतदारांसमोर उभा राहिला आहे. भविष्यात तापमानवाढीमुळे किनारपट्टीच्या भागांना यापुढेही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये तग धरू शकणाऱया फळझाडांची लागवड करण्यावर संशोधन होण्याची आवश्यकता आहे. दापोली कृषी विद्यापीठ व वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामार्फत संशोधन होऊन शेतकऱयांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी वेगवेगळय़ा प्रजातींची फळझाडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
त्यातच रासायनिक खते, कीटकनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मजुरांच्या समस्येने देखील बागायतदार त्रस्त आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु, किटकनाशकांचीही विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामध्ये देखील भेसळीचे प्रकार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. गेल्या काही वर्षांत आंबा, काजू ही आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी प्रमुख पिके ठरली आहेत. या दोन्ही पिकांची उलाढाल कोकणामध्ये 50 हजार कोटीवर आहे. लाखो शेतकरी या दोन फळपिकांवर अवलंबून आहेत. परंतु, वातावरणातील सततच्या बदलांमुळे आंबा व काजू पिकांचे उत्पादन 30 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने शेतकरी, बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. यावर्षी नुकसान झाले, तर पुढच्या वर्षी पिक मिळेल, त्यातून कर्ज फेडता येईल, अशी भावना शेतकऱयांमध्ये असते. परंतु, मागील चार-पाच वर्षांत शेतकऱयांच्या हातात पिकच येईनासे झाले आहे.
कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. फयान आणि तौक्ते यासारखी मोठी चक्री वादळे आल्यानंतर आंबा बागायतींचे नुकसान तर होतेच. परंतु मच्छीमारांनाही त्याचा मोठा फटका बसत असतो. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. सातत्याने बदलत्या हवामानामध्ये सोसाटय़ाच्या वाऱयाचा आणि चक्रीवादळाचा परिणाम होऊन मत्स्योत्पादनावर परिणाम होत आहे. मच्छीमारांना मासेमारीसाठी समुदात जाणेसुद्धा बऱयाचवेळा अवघड असते. त्यामुळे मासेमारी होऊ शकत नाही. तर दुसरीकडे परराज्यातील एलईडी ट्रॉलरधारकांकडून बेकायदेशीरपणे कोकण किनारपट्टीवर मासेमारी होत असल्याने आधीच मच्छीमार त्रस्त असताना बदलत्या हवामानामुळे मच्छीमारांसमोरील आव्हाने वाढू लागली आहेत. ठराविक दिवसांच्या फरकाने, सातत्याने समुद्रात वादळ सदृशस्थिती निर्माण होत असल्याने मच्छीमारांना आपल्या नौका सुरक्षित बंदराच्या ठिकाणी न्याव्या लागत आहेत. यामध्ये मत्स्यहंगामही बुडत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या सततच्या नुकसानीबाबत शासनस्तरावरून दखल घेणे आवश्यक आहे. तर बदलत्या हवामानामध्ये तग धरू शकणाऱया फळपिकांचे संशोधन होणे आवश्यक आहे. तरच आंबा बागायतदार शेतकरी स्थिरस्थावर होऊ शकेल अन्यथा त्यांचे आर्थिक दुष्टचक्र संपणार नाही.
संदीप गावडे








