सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
बेळगाव : आज सफाई कर्मचारी दिन आहे. या दिवशी त्यांचा गौरव करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण वर्षभर ते शहरातील कचरा जमा करून शहर स्वच्छ करत असतात. त्यांचे हे नित्याचे काम आहे. याचबरोबर हे काम करणेदेखील कठीणच असते. घरातील कचरा काढताना अनेक जणांना त्रास होतो तर ते संपूर्ण शहरच स्वच्छ करतात. तेव्हा त्यांचा एक दिवस गौरव करण्यात येणार असून शहरातील जनतेने एक दिवस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले. शहर स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. पहाटेपासूनच ते शहराच्या स्वच्छतेचा डोलारा उचलतात. दररोज न चुकता हे काम करावे लागते. सण असो किंवा कोणताही उत्सव असो. त्यांना सुटी ही नसतेच. आता शनिवार दि. 23 रोजी सफाई कर्मचारी दिन आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एक दिवस विरंगळा म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील कचरा उचल होणार नाही. तरी बेळगावकरांनी आपला घरातील कचरा घरात ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले. शहरातील घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल हे कर्मचारी नियमित करत असतात. तर काही ठिकाणी रस्त्यावर फेकण्यात आलेला कचरा एकत्रित करून तो कचरा वाहनांमध्ये भरुन कचरा डेपोला पाठवत असतात. याचबरोबर काही गटारींमध्येही कचरा साचून असतो. त्या गटारीदेखील साफ करण्याचे काम ते कर्मचारी नित्यनेमाने करत आहेत. शनिवारी सफाई कर्मचारी दिन असल्यामुळे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांनाही एक दिवस विश्रांती मिळणार असून त्यांना स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. मात्र बेळगावकरांनीही त्यांना सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.









