सातारा :
स्वच्छतेमध्ये सातारा नगरपालिकेने अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत. तरीही नियम राबवणारेच मोडत असतील तर स्वच्छ सातारा, सुंदर सातारा कसा होणार, दररोज सातारा शहरातून तयार होणारा सुमारे १५ टन कचरा हा ४० कचरागाडयाच्या माध्यमातून गोळा करुन तो कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. परंतु तो कचरा टाकताना ठेकेदारासोबत पालिकेने जो करार केला आहे. त्यात काही नियम व अटी, तरतूदी दिल्या आहेत. त्या तरतूदी बासनात बांधून ओला आणि सुका कचरा एकत्रच स्वीकारुन कशाबशा या कचरागाह्वया डेपोत पोहोचवल्या जात आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाची ऐसीतैसीच घंटागाडी चालकांकडून होताना दिसत आहेत.
सातारा शहरात दररोज निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेच्यावतीने ४० कचरागाड्याची सोय करण्यात आली आहे. या कचरा गाड्याच्या माध्यमातून दररोज तयार होणारा कचरा हा नेवून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. परंतु हा कचरा गोळा करताना वेगवेगळा स्वीकारला गेला पाहिजे. त्याकरता कचरा गाडीला दोन कप्पे केलेले आहेत. कचरा गाडीवर असलेल्या सहाय्यकाने कचरा स्वीकारतानाच तो ओला वेगळा आणि सुका वेगळा असा स्वीकारायचा असून त्याचे स्कॅनिंग दिलेल्या स्कॅनिंग करुन माहिती अपडेट करायची आहे. मात्र, तसे काहीच होत नाही. आलेला कचरा तसाच घेतात, दोन्ही एकत्र कचरा स्वीकारुन तो कसाबसा सोनगावच्या कचरा डेपोत खाली केला जातो. तेथे कचरा गाडी पोहोचल्यावर गाडीचे वजन करायचे असते. गाडी खाली केल्यावर तेथेच गाडी स्वच्छ करायची असते. मगच तेथून बाहेर काढायची असते. परंतु तसे न करता काही कचरा गाड्या या तेथून पुन्हा लोड होवून कुठे भंगारच्या दुकानाच्या दिशेने प्रवास करताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आढळल्या आहेत. त्या अनेकदा भंगारच्या दुकानाच्या बाहेर कचरागाहीतून काहीतरी उतरवताना दिसलेल्याच्या तक्रारीही झालेल्या आहेत. असे असताना कशा पद्धतीने सुंदर सातारा स्वच्छ सातारा होईल, असा सुर सातारकर आळवू लागलेत.
- ठेकेदारास सवलत दिली आहे काय?
जे करार आहेत त्यात जे नियम आहेत त्याची अंमलबजावणी होते आहे काय?, अनेक अटीचा भंग होत असल्याने नेमकी आरोग्य विभागाकडून ठेकेदारावर कोणती कारवाई केली जात आहे की आरोग्य विभागाकडून सवलत दिली जात आहे. यापूर्वीचे ठेकेदार हे बाहेरच्या जिल्ह्यातील होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोग्य विभाग कारवाई करताना कुठेही कमी पडत नव्हते. आता मात्र ठेकेदार हे साताऱ्यातील असल्याने आरोग्य विभागाकडून तेरी भी चुप मेरी भी चुप असा कार्यक्रम सुरु आहे?








