वार्ताहर/गुंजी
गोव्याहून बेळगावकडे जाणारा कचरा वाहू अवजड ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी गुंजीनजीक घडली. कचरा वाहू वाहन महामार्गावरून बेळगावकडे जात असताना गुंजीनजीक असलेल्या अर्धवट रस्त्यामुळे सदर वाहनाचा अपघात घडला. सध्या शिंपेवाडी क्रॉसजवळ दुहेरी रस्ता संपला आहे. त्या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र दुहेरी रस्ता संपलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशाफलक किंवा अडथळा निर्माण नसल्याने हा ट्रक थेट रस्ता नसलेल्या जागी जाऊन पलटी झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कंत्राटदाराचा हलगर्जीपणामुळे सध्या या मार्गावर अनेक अपघात घडत असून वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे. या आधीही याच ठिकाणी आणखी एक ट्रक रस्त्या बाहेर गेल्याने अपघात घडला होता. त्यामुळे सदर कंत्राटदाराने योग्य ते नियोजन करण्याची गरज वाहन चालकातून व्यक्त केली जात आहे.









