अन्यथा सदर वाहने अडवणार : प्रवाशांकडून इशारा
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरून ये-जा करणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेच्या वाहनचालकांची वाहने चालविताना मनमानी चालली असून त्यांनी आपल्या वेगावरती ताबा ठेवावा आणि वाहने सुरळीत चालवावीत. अन्यथा तुरमुरी गावाजवळ या गाड्यांना अडविण्यात येईल, असा इशारा या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांनी केला आहे. शनिवार दि. 21 रोजी वयस्कर वृद्ध दुचाकी वाहनावरून जात असताना या कचरावाहू वाहनाने मागून येऊन धडक दिली. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याला काही इजा झाली नाही. असे प्रकार सातत्याने घडत असतात. यावरती बेळगाव महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर वाहनचालकांना समज देणे गरजेचे आहे, असे प्रवासी व नागरिकांचे म्हणणे आहे.
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावर सातत्याने वाहनांची रहदारी असते. अशातच बेळगावमधील कचऱ्याची उचल करणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेची वाहने चालकाचा वेगावर ताबा नसताना कशीही चालवतात. यामुळे अनेकवेळा या मार्गावरती या वाहनाकडून अपघात झालेले आहेत. तसेच सध्या पुन्हा एकदा सदर वाहनचालक बेजबाबदारपणे वाहने चालवत असल्याचे निदर्शनाला आले असून प्रवाशांतून तक्रारी वाढल्या आहेत. साईड काढताना अथवा इतर वाहनांना साईड न देणे, वेगाने वाहने पाळविणे, विनाकारण हॉर्न वाजविणे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक वाहनचालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचेही आढळून आले आहे. बेळगाव बाची या मार्गावर अनेक दारूची दुकाने आहेत .सदर दुकानाच्या समोर ही वाहने पार्क करून दारू ढोसत असल्याचेही अनेकांकडून सांगण्यात आले.तरी तातडीने संबंधित खात्याने या कचरावाहू वाहनाच्या चालकांना सक्त ताकीद द्यावी. अन्यथा या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशाकडूनच या वाहनचालकांची दखल घेतली जाईल, असा प्रवाशांनी दिला आहे.









