प्रतिनिधी /शिरोडा
बोरी पंचायतीच्या ग्रामसभेत कचरा प्रक्रिया प्रकल्प, उघडय़ावर सोडले जाणारे सांडपाणी व अन्य विषयावर जोरदार चर्चा झाली. सरपंच ज्योती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या या ग्रामसभेत विविध विषयावर ठराव घेण्यात आले. पाच वर्षाच्या कार्यकाळातील ही शेवटची ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांनी विविध विषय सभेसमोर मांडले.
बोरी पंचारत क्षेत्रात यापुढे कुठलाही समाजोपयोगी प्रकल्प आणायचा असल्यास ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे तसेच त्यासंबंधी जनसुनावणी व्हावी या डेविड रॉड्रिगिस यांनी मांडलेल्या ठरावावर चर्चा होऊन तो संमत करण्यात आला. देऊळवाडा प्रभागात पाळीव डुकरांचा उपद्रव वाढल्याने संबंधीत मालकांना त्यासंबंधी नोटीस बजावण्याची मागणी शैलेश बोरकर यांनी केली. कलमामळ-बोरी येथे उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होऊन बरीच वर्षे उलटली तरी अजून हा प्रकल्प पूर्णत्वास येत नसल्याबद्दल त्यांनी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला. चौदावा वित्त आयोगातंर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून किती विकासकामे झाली याची यादी जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली. क्रीडा साहित्य वितरण, पंचायतीमध्ये नवीन कारकून भरती या अन्य विषयावरही चर्चा झाली. शिरशिरे-बोरी ते मुरम्यारपर्यंतच्या नाल्यामध्ये बाजूच्या घरातून मोठय़ाप्रमाणात सांडपाणी व शौचालयातील मलनिस्सारण होत असल्याने संबंधीतांवर कारवाही करावी असा ठराव घेण्यात आला. जि. पं. सदस्य दीपक बोरकर यांनी जिल्हा पंचायत निधीतून सिद्धनाथ पर्वतावर सुलभ शौचालय बांधून देणार असल्याची माहिती दिली. बोरी आरोग्य केंद्रात 24 तास डॉक्टर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
बोरी पंचायत क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चेला आला. त्यावर जोरदार चर्चा झाली. बोरी कोमुनिदादने प्रकल्पासाठी जमीन सुपूर्द केल्यास लवकरात लवकर कचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा सरपंचांनी केली. पंचायतीकडे रु. 50 लाखांचा निधी समाजोपयोगी कामासाठी उपलब्ध आहे. हा निधी कचरा प्रकल्पावर खर्च करता येईल. येत्या ऑगस्टपर्यंत त्याचा वापर न झाल्यास तो माघारी जाणार असल्याचे सांगण्यात आल. त्यासाठी कोमुनिदादने लवकरात लवकर जमीन उपलब्ध करुन देण्याचा ठराव घेण्यात आला. तळप, सोनारभाट व तामशिरे येथे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने संबंधीत घरांवर कारवाही करावी अशी मागणी करण्यात आली. या मुद्यावर जोरदार चर्चा झाली. वारंवार ग्रामसभाना अनुपस्थित राहणाऱया पंचसदस्यांवर कारवाई करण्याची मागणी राहुल नाईक यांनी केली. पंचायतीतर्फे लागू करण्यात आलेल्या कचरा शुल्कावर फेरविचार करावा व योग्य प्रकारे सर्वेक्षण करुन नंतरच आवश्यक त्या भागात हा कर लागू करावा असा ठराव संमत करण्यात आला. बोरी पंचायतीसाठी स्वतंत्र मार्केट प्रकल्प, मासेविक्री मार्केट व कचरा प्रकल्पासाठी कोमुनिदादची लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. कलमामळ-बोरी येथील मैदानावर क्रिकेटसाठी खेळपट्टी तयार करण्याचा ठराव घेण्यात आला.
सभेला पंचसदस्य विनय पारपती, तुकाराम बोरकर, फिलोमिना वाझ, महिमा नाईक, कमलाकांत गावडे, दिपिका नाईक, जि. पं. सदस्य दीपक नाईक बोरकर हे उपस्थित होते. पंचायत सचिव मयूर कुडाळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. निरीक्षक म्हणून फोंडा गटविकास कार्यालयाच्या रुपाली पै या उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थ उत्कर्ष प्रभ्रू बोरकर, राजू वर्दे, राहूल नाईक, सचिन नाईक, हर्षा बोरकर, प्रशांत नाईक, सुदेश बोरकर, दिपेश शिरोडकर, ऑफिलीया रॉड्रिगिस, डेविड रॉड्रिगिस, शैलेश बोरकर, सुधाकर भट व अन्य ग्रामस्थांनी भाग घेऊन विविध सूचना केल्या.









