वर्षभरापासून नवीन कचरावाहू रिक्षा धूळखात
मजगाव : ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पिरनवाडी ग्राम पंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यापासून सर्व व्यवस्था कोलमडून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी खड्डे तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग अशा अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. नगरपंचायतीमध्ये प्रशासक कारभार असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निरसन करणारे वाली कोणी नाहीत. ना कॉम्प्युटर उतारा.. ना इतर नोंदी… अशा अनेक समऱ्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नगर पंचायतीमार्फत कचरा गोळा करणारे ठेकेदार एकच ट्रॅक्टरमधून संपूर्ण पिरनवाडी गावातील कचरा गोळा करीत असतात. अपुऱ्या कामगारांमुळे काम पूर्ण होत नाही. गेल्या वर्षभरापासून नगरपंचायतीतील कचरा गोळा करण्यासाठी नवीन तीन रिक्षा नगरपंचायतच्या समोर उभी आहेत. त्या नव्या कोऱ्या रिक्षा गेले वर्षभर धूळखात उघड्यावर उभ्या आहेत. पंरतू त्यांचा वापर केला जात नाही.









