शहरात प्रवेश करताना करावे लागते कचऱ्याचे दर्शन, स्वच्छतेकडे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील युनियन जिमखाना ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कित्येक दिवसांपासून पडून असलेल्या कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला तरी या मार्गावरील कचरा जैसे थेच आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या मार्गावर मागील सहा महिन्यात कचरा वाढला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. यामध्ये टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, मृत जनावरे आदींचा समावेश आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. विशेषत: पावसामुळे दुर्गंधीत वाढ होऊ लागली आहे. तर दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरू लागले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सामना करावा लागत आहे. प्रशासन मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. मार्गावर पडक्या घरांची माती, पिशव्या आणि इतर टाकाऊ साहित्य देखील टाकण्यात आले आहे. त्यामुळे मार्गाला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे. पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्याच्या आणि शहराच्या सौंदर्याला देखील बाधा पोहचत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही नागरिक या ठिकाणी कचरा टाकू लागले आहेत. त्यामुळे मनपा आणि पोलीस प्रशासनाने वॉचमनची नेमणूक करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे. पश्चिम भागातून शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावरच कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याचे दर्शन घेऊन यावे लागत आहे. शेजारी असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वच्छता पाहायला मिळते. मात्र, याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर मात्र कचरा पसरलेला दिसून येत आहे.









