तातडीने कचरा उचल करण्याची मागणी
बेळगाव : नानावाडी-सावगाव रोड येथील मुख्य रस्त्यावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. वेळेत उचल होत नसल्याने स्थानिक नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. तातडीने कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शहराचा विस्तार जसजसा वाढत चालला आहे. तसतशी कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध ठिकाणी कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने समस्या गंभीर बनू लागली आहे. सावगाव रोडवर कचऱ्याची उचल होत नसल्याने याठिकाणी भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांसह महिलांना ये-जा करणे धोक्याचे बनू लागले आहे. भटक्या कुत्र्यांकडून कचरा विखुरला जात आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे.









