संबंधितांचे दुर्लक्ष, रहिवासी-व्यावसायिकांना मन:स्ताप
बेळगाव : बेळगाव-राकसकोप मार्गावर गणेशपूरनजीक मुख्य रस्त्यावर कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विशेषत: गणेशपूर मुख्य मार्गानजीकच कचरा असल्याने सौंदर्यालाही बाधा येत आहे. संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कचरा जाग्यावर पडून आहे. या मार्गावर रस्त्याच्या शेजारी कचरा पसरल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे शहरालगत असलेल्या गणेशपूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. गणेशपूर मुख्य रस्त्यावर कचरा पडून असल्याने शेजारी असलेल्या व्यापारी, विक्रेते आणि रहिवाशांनाही याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. विशेषत: रस्त्यावर असलेल्या हॉस्पिटल आणि दवाखान्यांमधील रुग्णांनाही त्रास होत आहे.
ग्राम पंचायतीने तातडीने कचऱ्याची उचल करावी
परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांकडून रस्त्यासमोरच कचरा टाकला जात आहे. शिवाय ग्राम पंचायतीकडून वेळोवेळी कचऱ्याची उचल होत नसल्याने समस्या गंभीर बनू लागली आहे. यामध्ये प्लास्टिक, बॉटल आणि इतर कचऱ्याचा समावेश आहे. घरगुती कचराही यामध्ये टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. शिवाय शेजारी असलेले फास्ट फूड आणि इतर व्यावसायिकही टाकाऊ पदार्थ या ठिकाणी टाकत असल्याने डुक्कर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. आधीच डुकरांच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच कचऱ्याची समस्या अधिक असल्याने डुकरे आणि भटक्या कुत्र्यांपासून समस्याही गंभीर बनू लागली आहे. ग्राम पंचायतीने तातडीने कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.









