निवडणुकीच्या नावाखाली मनपा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा
बेळगाव : शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. बीव्हीजीला टेंडर दिले असे सांगितले जात आहे. मात्र अद्याप या कंपनीने डिपॉझीट जमा केले नाही. त्यामुळे नेमका कचऱ्याचा टेंडर कोणाला देण्यात आला आहे. याचबरोबर महापालिका आयुक्त केवळ सत्ताधारी नगरसेवकांचेच ऐकत आहेत. तेव्हा त्यांना योग्य ती सूचना करावी यासह इतर मागण्यांसाठी म. ए. समितीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. कचऱ्याची समस्या नेहमीचीच आहे. आता तर विधानसभा निवडणुकीमुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्ही निवडणुकीच्या कामामध्ये आहे, असे सांगत आहेत. वास्तविक, नियमानुसार सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच स्वच्छता विभागातील साहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये, असा आदेश आहे. असे असताना त्यांना चेकपोस्ट नाक्यावर वाहने तपास करण्याचे काम देण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. कचरा गोळा करण्यासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मात्र त्या वाहनांची उंची अधिक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यामध्ये कचरा टाकणे अवघड जात आहे. तेव्हा त्या वाहनांना स्टॅन्डची गरज आहे. सध्या युजीडीचे काम सुरू आहे. ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार घाईगडबडीत कामे करत आहेत. या कामांचा दर्जा योग्य नसल्याने काही वर्षांतच ड्रेनेजचे चेंबर पुन्हा खराब होणार आहेत. तेव्हा याबाबत संबंधित कंत्राटदाराला योग्य ती सूचना करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, सिद्धार्थ भातकांडे आदी उपस्थित होते.









