उचल करण्याकडे दुर्लक्ष : करावा लागतोय दुर्गंधीचा सामना
बेळगाव : सीबीटी बसस्थानकासमोर असलेल्या कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने कचरा समस्या गंभीर बनू लागली आहे. एकीकडे स्मार्ट बसस्थानक निर्माण करून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाच्या समोर कचरा साचून राहत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकासमोरच कचऱ्याची समस्या असे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, वेळेत कचरा उचलला जात नसल्याने तो सर्वत्र विखुरला जात आहे. परिणामी रोगांना आमंत्रण मिळू लागले आहे. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने कचऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सतत वर्दळ असणाऱ्या बसस्थानकासमोर कचऱ्याचा ढीग पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच दुर्गंधीही पसरली आहे. बसस्थानकाच्या मार्गावर दोन-तीन ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाच्या सौंदर्याला धोका पोहोचू लागला आहे. तब्बल 31 कोटींच्या निधीतून बसस्थानकाची उभारणी केली जात आहे. विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे या मार्गावरील विक्रेते टाकावू पदार्थ जागेवरच टाकून जात असल्याने कचऱ्याचा ढीग निर्माण झाला आहे. विशेषत: फळ विक्रेते आणि इतर विक्रेत्यांकडून पदार्थ टाकले जात आहेत. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. बसस्थानक स्मार्ट झाले, मात्र समोरील कचऱ्याचे काय? असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे.









