मनपा आयुक्तांनी कायमस्वरुपी प्रश्न मार्गी लावावा
बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर या ठेकेदाराला देण्यात आला असल्याने नवीन ठेकेदारांकडून बेळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अद्यापही कचरा समस्या जैसे थे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कलमठ रोडवरील महापालिकेच्या कार्यालयासमोर कचऱ्यांने भरलेल्या पिशव्या पडून आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनदेखील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कलमठ रोडवर महापालिकेचे कार्यालय आहे. शेजारीच शववाहिनीही उभी केली जाते. सकाळच्यावेळी स्वच्छतेसाठी येणारे कर्मचारी परिसरातील कचरा गोळा करून कार्यालयासमोर गोळा करून ठेवतात. मात्र त्याची उचल होत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यापूर्वीही अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण ही समस्या मात्र काही सुटलेली नाही. कचऱ्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.









