ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : चालकाचे मानधन थकल्याने कचरागाड्या तशाच उभ्या : ग्रा. पं.च्या कार्यपद्धतीवर संताप
वार्ताहर /गुंजी
गुंजीत कचरागाडी बंद झाल्यापासून गल्लोगल्ली रस्त्यावरती कचऱ्याचे ढीगारे दिसत असून ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कार्यपद्धती व दुर्लक्षामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वास्तविक गुंजीसह ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातील कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने गतवषीपासून कचरा डेपो आणि कचरागाडी सुरू केली होती. जवळजवळ सात ते आठ महिने दररोज ही कचरागाडी वेगवेगळ्या गावात फिरवून कचरा संकलन केले जात होते. मात्र कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेत मानधन मिळत नसल्याच्या कारणाने अचानकपणे ही कचरागाडी फिरण्याचे बंद झाली.
बरेच दिवस पंचायतीने दिलेल्या बादल्यांमध्ये नागरिकांनी कचरा साठवून ठेवून कचरागाडी येण्याची वाट पाहिली. मात्र गाडी येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने अखेर सदर कचरा अनेक ठिकाणी फेकण्यात येत आहे. त्यामुळे गावातील रस्त्यांबरोबरच गावाच्या सभोवताली कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे कचरा विल्हेवारीसाठी लाखो ऊपये खर्च करण्यात आलेला कचरा डेपो व कचरागाडी कुचकामी ठरली असून धूळखात पडली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
अद्याप कर्मचाऱ्यांना मानधन नाही
गुंजी ग्रामपंचायतीने कचरा उचल करण्यासाठी गुंजीतील एका स्वसहाय्य संघातील चार महिलांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये एका महिला चालकाचाही समावेश होता. जवळजवळ सहा महिने काम केल्यानंतर वेळोवेळी मानधनाची मागणी करूनही वेळेत मानधन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर कामावर जाण्याचे सोडून दिल्याने कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते. त्यानंतर काही महिन्यांचे मानधन देण्यात आले असले तरी अद्याप उर्वरित दोन-तीन महिन्याचे मानधन देण्यात आले नाही, असे या महिला कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वास्तविक जिह्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये महिला चालक मिळत नसल्याने अनेक कचरागाड्या चालकाविना तशाच उभ्या आहेत. मात्र गुंजीमध्ये महिला चालक मिळूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी कचरागाडी थांबली असल्याने गुंजी ग्राम पंचायतीच्या कार्यपद्धतीवर खेदजनक संताप व्यक्त केला जात आहे. तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन सदर कर्मचाऱ्यांचे मानधन द्यावे व कचरागाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.









