अधिवेशन काळात तरी कचरा हटणार का? : नागरिकांचा सवाल : शहर परिसर स्वच्छ करण्याची मागणी
बेळगाव : शहराला लागून असलेल्या विविध नगर तसेच ग्राम पंचायतींचा कचरा रस्त्याच्या कडेला तसाच पडून आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक घेवून त्या कचऱ्याची उचल करावी, अशी सूचना केली होती. मात्र अजूनही काही ग्राम पंचायतींचा कचरा महापालिकेच्या हद्दीमध्ये फेकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी संबंधितांना पुन्हा एकदा सक्त सूचना करावी, अशी मागणी होत आहे. शहराचा विस्तार वाढत चालला आहे. बऱ्याच ग्राम पंचायतींची हद्द शहराला लागलेली आहे. ग्राम पंचायतीचा कचरा महापालिकेच्या हद्दीमध्ये टाकण्यात येत आहे. तो कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलण्याचे थांबविले आहे. मात्र यामुळे त्या ठिकाणी भटकी कुत्री तसेच मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही भटकी कुत्री अचानकपणे हल्ला करत आहेत. तेव्हा शहराला लागून असलेला कचरा ग्राम पंचायत तसेच महापालिकेने संयुक्तरित्या उचलून शहर व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.
पाहुण्यांचे स्वागत कचऱ्यानेच होत असल्याचे चित्र
दरम्यान महत्त्वाचे म्हणजे शहराच्या प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात कचऱ्याची ढीग आढळून येत आहेत. ग्राम पंचायत हद्दीतील कचरा असला तरी शहराच्या प्रवेशद्वारासमोरच त्याचे ढीग असल्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कचऱ्यानेच होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता अधिवेशन होणार आहे. त्यामुळे काही भागातील कचरा उचल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सांबरा येथील कचरा उचल करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या परिसरातील कचऱ्याची उचल केली गेली आहे.
कचरा उचलसाठी पाऊल उचला
पिरनवाडी परिसरात मात्र कचऱ्याचे ढीग तसेच साचून आहेत. याचबरोबर बेनकनहळ्ळी, कंग्राळी बुद्रुक, यमनापूर या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. तेव्हा या परिसरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे. तेव्हा महापालिकेच्या आयुक्तांनी पुन्हा एकदा संबंधितांना सूचना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.









