पाच हजाराचा ठोठावला दंड : कचरा भरून घेण्यास पाडले भाग
बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी मनपाने कंबर कसली आहे. कचरा रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी टाकण्याऐवजी त्याचे वर्गीकरण करून घंटागाडीकडे द्यावा, असे आवाहन केले जात असले तरी गणपत गल्ली येथील व्यापाऱ्यांकडून मात्र कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. ही बाब मनपाच्या पर्यावरण विभागाने गांभीर्याने घेत गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांवर कारवाई केली. टाकलेला हा कचरा व्यापाऱ्यांनाच काढण्यास सांगत पाचहजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
स्वच्छ आणि सुंदर बेळगाव व्हावे, यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. कचरा कोठे न टाकता कचरा कुंडीतच टाकावा, असे वारंवार सांगितले जात आहे. तसेच सुरतच्या धरतीवर शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबीन बसविले आहेत. मात्र सदर डस्टबीनमध्ये कचरा टाकण्याऐवजी बहुतांशजण डस्टबीन बाहेरच कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक डस्टबीनचा वापर व्यवस्थितरित्या होत नसल्याने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी मनपाने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तीन महिन्यांपासून ओला, सुका, प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतरच कचऱ्याची उचल होत आहे.
यापूर्वी तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वेळ वाया जाण्यासह पैसाही अधिक खर्च करावा लागत आहे. मात्र कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने महापालिकेची दरमहा दहालाख रुपयांची बचत होत आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवारपेठ, पांगुळ गल्ली, कांदा मार्केट, हेमूकलानी चौक आदी ठिकाणच्या कचऱ्याची उचल करण्यासाठी मनपाकडून दोन स्वतंत्र घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडे कचरा देण्याऐवजी गणपत गल्लीतील काही व्यापारी रस्त्यावरच कचरा टाकून देत आहेत. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास येताच रविवारी गणपत गल्ली येथे आरोग्य विभागातील पर्यावरण अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी दुकानासमोर काचरा टाकलेल्या व्यापाऱ्याला सदर कचरा भरून घेण्यास भाग पाडले.
कारवाईमुळे धास्ती
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे रस्त्यावर कचरा टाकून परिसर गलिच्छ करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यावेळी साहाय्यक पर्यावरण अभियंता आदिलखान पठाण, बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती आदी उपस्थित होते.
शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसामुळे सोमवारी शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली. यामुळे वीजवाहिन्या तसेच वीजखांबांचे मोठे नुकसान झाले. वीजवाहिन्या तुटल्याने बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा ठप्प होता. सोमवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस दाखल झाला. यामध्ये कॅम्प, सदाशिवनगर, गणेशपूर रोड, मराठा कॉलनी यासह इतर भागात झाडे कोसळली. झाडे विद्युत वाहिन्या तसेच खांबांवर कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झाला. तासभराहून अधिक वेळ पाऊस झाल्याने दुरुस्तीचे काम करणे शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु बेळगाव दक्षिण विभागात सर्वाधिक झाडे कोसळल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह गणेशपूर रोड, हिंडलगा आदी परिसरामध्ये वीजपुरवठा ठप्प होता. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला.









