परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : महापालिका ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील शहरातील जनता विविध ठिकाणी कचरा फेकून देत आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरपीडी जवळील उदय भवन हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यामध्ये कचऱ्याचा ढीग पडला असून या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेमध्ये महापालिका सायंकाळपासून रात्रीपर्यंत घंटागाडी फिरवून कचरा गोळा करत आहे. मात्र अद्याप टिळकवाडी परिसरात ही घंटागाडी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक व नागरिक या रस्त्यामध्ये कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे मोठा कचऱ्याचा ढीग तसाच पडून आहे. याकडे आता महापालिका लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनतेनेही सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा याचा त्रास नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे.









