भटक्या कुत्र्यांचा वावर, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : मनपाने त्वरित उचल करण्याची मागणी
बेळगाव : स्टेशनरोड येथील कचऱ्याची उचल करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा तसाच पडून आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे मनपाने लक्ष देऊन कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे. विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून असले तरी त्याची वेळेत उचल केली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कचऱ्याच्या ठिकाणी भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. स्टेशन रोड येथे अनेक हॉटेल्स आहेत, त्यामुळे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. कचरा टाकण्यासाठी त्याठिकाणी डस्टबीन ठेवण्यात आली आहे. मात्र डस्टबीनमध्ये कचरा टाकण्याऐवजी नागरिक रस्त्यावरच उघड्यावर कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखीदेखील वाढली आहे.
कचरा टाकू देणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करा
विशेष करून स्टेशन रोडच्या कोपऱ्यावर ओला कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. डस्टबीन बाहेर टाकण्यात आलेल्या कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर बाहेर कचरा टाकू देणाऱ्यांवरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून असे प्रकार थांबण्यास मदत होईल. याकडे मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.









