प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी
वास्को : हेडलॅण्ड सड्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची स्थिती आणि या प्रकल्पापासून जवळच असलेल्या जमिनीवर करण्यात आलेल्या कचऱ्यावरील प्रक्रियेनंतर तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीची गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रक्रिया करण्यात आलेला कचरा मातीच्या भरावासह येत्या पावसाळ्यात वाहून समुद्रात जाण्याचा धोका स्थानिकांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पातील आगही गेले पाच महिने धुमसत आहे. हेडलॅण्ड सड्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात जानेवारी महिन्यात आग लागली होती. ही आग विझविणे अवघड ठरल्याने अखेर पेटणाऱ्या कचऱ्यावर ट्रकांव्दारे मातीचे भरात घालून ती आग विझवावी लागली होती. मात्र, हा प्रयोग तात्पुरता ठरला आहे. अद्यापही या प्रकल्पात आग धुमसत असते. त्यामुळे त्या मातीखालील कचऱ्यात अद्यापही आग असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या प्रकल्पाच्या अव्यवस्थेचा स्थानिक नागरिकांना बराच त्रास होत आहे. या प्रकल्पापासून जवळच असलेल्या शासकीय जमीनीवर काही वर्षांपूर्वी बऱ्याच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर प्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी खास प्रकल्प उभारण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया करण्यात आलेला कचरा त्याच जमीनीवर पसरवीण्यात आलेला आहे. या कचऱ्याचा भरावच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या कचऱ्याच्या भरावावर मातीचा भराव घालून कचरा झाकण्यात आलेला आहे. डोंगराच्याकडेपर्यंत कचरा आणि मातीचा भराव घालण्यात आलेला असून ही माती त्या कचऱ्यासह येत्या पावसात समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि जवळच्या जमीनीवर टाकण्यात आलेला प्रक्रिया केलेल्या कचऱ्याने समस्या निर्माण केलेल्या असल्याने या समस्यांविरूध्द स्थानिक समाजसेवक व नागरिकांनी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार काल बुधवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना भेट देऊन समस्यांची पाहणी केली. गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ या समस्यांवर कोणती उपाययोजना करते याकडे सड्यावरील लोकांचे लक्ष लागलेले आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे.









