रस्त्याचे अस्तित्व धोक्यात, झाडांची कत्तल, परिसर बनला उजाड
प्रतिनिधी/बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील महात्मा गांधी पुतळ्यानजीक कचरा समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याबरोबर चौकाच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण झाली आहे. या रस्त्याशेजारी वाहनांमधून कचरा आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि असह्या दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
युनियन जिमखान्यापासून सुरू होणारा बेळगाव-वेंगुर्ला मार्ग गांधी पुतळ्यापर्यंत अत्यंत दर्जेदार आहे. या रस्त्याला आवश्यक असा उतार असल्यामुळे पावसाचे पाणीही रस्त्यावर तुंबत नाही. त्यामुळे हा डांबरी रस्ता अत्यंत सुस्थितीत आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेजबाबदार नागरिकांनी कचऱ्याचे ढिगारे रचल्याने सकाळच्यावेळी फिरावयास येणारे नागरिक आणि वाहनधारकही या रस्त्यावरून ये-जा करणे टाळत आहेत.
या मार्गावर दुतर्फा झाडी आणि रस्ता गुळगुळीत आहे. मात्र, रस्त्याशेजारी टाकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्याला बकालपणा आला आहे. तसेच काही पशुपालक येथील झाडपाल्याची तोडणी करत असल्यामुळे हिरवाईही नष्ट होत आहे. शिवाय भटकी कुत्री आणि जनावरांमुळे हा कचरा सर्वत्र विखुरला गेला आहे. शहरातील कचऱ्याची तुरमुरी कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही बेजबाबदार व्यक्तींनी रस्त्याशेजारीच कचरा टाकला आहे. त्यामुळे मनपाने आता अशावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कत्तल खान्यातील पदार्थ टाकत असल्याने दुर्गंधी
या मार्गावर कत्तल खान्यातील जनावरांचे टाकाऊ पदार्थ आणून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांनाही धोका निर्माण झाला आहे. वास्तविक हा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत येतो. येथे पूर्वी असलेल्या मिलिटरी फार्ममुळे हा परिसर अधिक संरक्षित होता. मात्र, आता मिलिटरी फार्म बंद केल्याने कचरा टाकण्याबरोबरच येथील झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांतूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









