खानापूर : बेळगाव-चोर्ला रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून गोवा येथून येणाऱ्या वाहनातून कचरा टाकण्याच्या प्रमाणात तसेच गेल्या वर्षभरात कचरा वाहून नेणाऱ्या मोठ्या ट्रकचा वेळोवेळी अपघात झाल्याने जांबोटी-चोर्ला रस्त्यावर अनेक वेळेला या वाहनातील कचरा रस्त्याच्या बाजूला जंगलात पडून राहिला. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. तसेच जंगलातील प्राणी या कचऱ्यासाठी रस्त्यावर येत असल्याने अनेक वेळेला हे प्राणी दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांनी खबरदारी घेऊन कचऱ्याची वाहतूक करावी, तसेच खासगी वाहनातून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिकांतून आणि पर्यावरणवाद्यांकडून होत आहे.
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्त्यावर (गोवा हद्द) रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेळगाव आणि गोव्यातील कचरा टाकण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. कणकुंबी भागातील पारवाड क्रॉस, चिखले, बेटणे, आमटे ते कालमणी दरम्यान अनेक ठिकाणी गोव्यातील कचरा टाकला जातो. तसेच किणये, उचवडे, बैलूर क्रॉस ते कुसमळीपर्यंत बेळगाव परिसरातील कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकला जात आहे. कचरा टाकण्याचे प्रकार काही ठराविक टेम्पोचालक किंवा कॅन्टरचालकच करत आहेत. बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या काही वाहनांतून तसेच गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या काही वाहनांमधून हा कचरा रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात येत आहे. यावर पोलीस प्रशासन किंवा वनखाते देखील राजरोसपणे बघत असून देखील अशा वाहनधारकांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.
गेल्या दोन वर्षाच्या काळात गोव्याहून बागलकोटकडे वाहतूक होणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या ट्रकचा अनेकवेळा अपघात झाल्याने कचरा वाहून नेणारी वाहने कलंडण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. वाहने कलंडल्यानंतर कलंडलेली वाहने काढण्यात येतात. मात्र कचरा त्याच ठिकाणी पडून राहतो. गेल्या पंधरा दिवसापूर्वी कालमणी ते आमटे या दरम्यान गोव्याहून बागलकोटकडे कचरा वाहून नेणारा ट्रक कलंडल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. तसेच वाहन काढल्यानंतर कचरा मात्र रस्त्याच्या बाजूलाच ढीग मारुन ठेवला आहे. त्यामुळे पाळीव जनावरांबरोबरच रात्री, अपरात्री जंगली जनावरेसुद्धा हा केरकचरा विस्कटून टाकतात. त्यामुळे या प्राण्यांना धोका निर्माण होत आहे. तसेच कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वनखाते आणि पोलीस खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा टाकण्याचे प्रकार तसेच अपघातानंतर कचऱ्याची उचल वेळेत होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनखाते, पोलीस खात्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.









