कचऱ्यामुळे वाहनधारकांना त्रास : कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणार कोण?
वार्ताहर /किणये
स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. तालुक्याच्या विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येऊ लागली आहे. मात्र गणेशपूर भागात सदर योजना राबविण्यात येत नाही का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कारण गणेशपूर मुख्य रस्त्यावरच कचरा टाकण्यात येऊ लागला आहे. यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होऊ लागला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव-राकसकोप रस्त्यावरील गणेशपूर परिसरातील मुख्य रस्त्याच्या ठिकाणीच भलामोठा कचऱ्याचा ढिगारा निदर्शनास येत आहे. गणेशपूर येथील गणेश मंदिराजवळ रस्त्यावर हा कचरा टाकण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरच कचरा असल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊ लागली आहे. दुकान तसेच इतर विविधप्रकारच्या दुकानातील टाकावू साहित्य, प्लास्टिक बाटल्या व काहीजण घरगुती केरकचरा या ठिकाणी टाकत आहेत, अशी माहिती काही जणांनी दिली आहे. केरकचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी. तेव्हाच या ठिकाणी कचरा टाकणे कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.









