प्रतिनिधी /बेळगाव
दक्षिण विभागातील कचऱयाचे संपूर्ण ढिगारे हटविण्यात आल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शहराबाहेरील रस्त्यांवर कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. वडगाव परिसरात येळ्ळूर रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असून काही कचरा रस्त्याशेजारी शेतीमध्ये टाकला जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छतेचे काम करण्यासाठी 20 कोटींहून अधिक निधी खर्च केला जातो. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दक्षिण विभागातील कचराकुंडय़ा पूर्णपणे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ असल्याचा दावा मनपा अधिकाऱयांनी केला आहे. स्वच्छता निरीक्षकांचे काम चांगले असल्याचे सांगून केवळ उत्तर विभागातील स्वच्छता निरीक्षकांना नोटीस बजाविण्याची कारवाई मनपा आरोग्य विभागाने केली आहे. पण दक्षिण विभागातील मुख्य रस्त्यावरील कचराकुंडय़ा हटविण्यात आल्या असल्या तरी उपनगरात कचऱयांचे ढिगारे साचत आहेत. विशेषतः वडगाव परिसरातील स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.
येळ्ळूर रोड तसेच यरमाळ रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. दुचाकीवरून ये-जा करणारे घरातील कचरा रस्त्याशेजारी टाकत आहेत. त्याचप्रमाणे जेल शाळेच्या मागील बाजूस कचरा टाकला जात आहे. याकडे स्वच्छता निरीक्षकांनी साफ दुर्लक्ष केले आहे. जर घरोघरी कचऱयाची उचल केली जाते तर रस्त्याशेजारी कचरा कसा साचतो? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी या परिसराची पाहणी करून स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.









