विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱया फांद्या तोडण्याची मोहीम : पण कचरा तेथेच टाकून देण्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱया विद्युत वाहिन्या हटविण्याची मोहीम हेस्कॉमच्यावतीने राबविण्यात येते. पण तोडण्यात आलेल्या झाडाच्या फांद्या व पालापाचोळा त्याच ठिकाणी टाकण्यात येतो. हेस्कॉमकडून कचऱयाची उचल केली जात नाही. तर हेस्कॉमने झाडे तोडल्याचे सांगून महापालिकेकडून कचऱयाची उचल करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण हेस्कॉम आणि महापालिकेच्या वादात कचरा साचत असून याबाबत तोडगा कधी निघणार, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
शहरवासियांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी तसेच कोणत्याही दुर्घटना घडू नयेत याकरिता विद्युत वाहिन्यांना स्पर्श करणाऱया झाडांच्या फांद्या हेस्कॉमकडून हटविण्यात येतात. सदर मोहीम नेहमी राबविण्यात येत असून तोडण्यात आलेल्या झाडाच्या फाद्यांची उचल हेस्कॉमकडून केली जात नाही. विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱया फांद्या तोडून रस्त्याशेजारी टाकल्या जातात. पण सदर झाडाच्या फांद्या अनेक दिवस त्याच ठिकाणी पडून राहतात. काहीवेळा पाला कुजून दुर्गंधी पसरते. पण कचऱयाची उचल केली जात नाही. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे तक्रार केली असता हेस्कॉमने झाडाच्या फांद्या तोडल्याचे सांगून महापालिकेकडून उचल करण्यास टाळाटाळ केली जाते.
तर स्वछतेचे काम महापालिकेचे असल्याचे सांगून हेस्कॉमकडून कचऱयाची उचल करण्याकडे कानाडोळा केला जातो. यामुळे कित्येक दिवस कचरा पडून राहतो. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. झाडाचा पाला साचून राहिल्याने कुजून दुर्गंधी पसरते. हेस्कॉम आणि महापालिकेच्या वादात शहरातील रस्त्याशेजारी झाडाच्या फांद्याचा कचरा साचून रहात आहे. वर्षानुवर्षे हा वाद सुरू असून याबाबत कोणताच तोडगा काढण्यात आला नाही.
जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालण्याची मागणी
सर्व खात्यामध्ये समन्वय साधून सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी बैठका घेतल्या जातात. पण झाडाच्या फांद्यामुळे होणाऱया कचऱयाची उचल कोण करणार, याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे महापालिका आणि हेस्कॉमच्या वादाकडे जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक नितेश पाटील यांनी लक्ष घालून समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
कचरा उचल कोण करणार?
आधारलिंकबाबत जागृती फेरी काढतेवेळी कोरे गल्ली येथे डाकबंगल्याशेजारी रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडल्याचे महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ कचऱयाची उचल करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी मनपा अधिकाऱयांना केली. पण शहरात ठिकठिकाणी विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱया झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. त्याची उचल कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









