स्वच्छता करण्याची मागणी
येळ्ळूर : बळ्ळारी नाला कचराकुंड बनला आहे. नाल्यातच नाही तर या नाल्याच्या पुलावरदेखील कचरा फेकला जात आहे. त्यामुळे वडगाव-येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी पुलावर कचऱयाचा ढीग साचून आहे. या प्रकारामुळे या परिसरातून फिरणेदेखील कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने येथील कचरा हटवावा, अशी मागणी होत आहे. बळ्ळारी नाला हा बेळगावकरांसाठी एक शापच ठरलेला आहे. एक तर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या नाल्यामध्ये गाळ आणि कचरा साचून पाणी शिवारात शिरून शिवाराचे मोठे नुकसान होत आहे. डेनेजचे पाणी या नाल्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातील शेतकऱयांना शेतात काम करणे अवघड बनले आहे. या नाल्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. त्या पुलावरही आता कचरा साचून आहे. दोन्ही बाजूला कचऱयाचे ढीग पडून आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्स तसेच इतर पादचाऱयांना तेथून ये-जा करणे कठीण जात आहे. तेव्हा तातडीने हा कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









