गावात कचरागाडी असूनही फिरत नाही : ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
बस्तवाड-हलगा गावात कचरा वाहतूक गाडी आहे. मात्र सदर गाडी गावभर फिरत नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. बस्तवाड -हलगा सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. त्यामुळे या भागातील सौंदर्य धोक्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली. ग्रा.पं.तर्फे बस्तवाड-हलगा येथे कचरा जमा करण्यासाठी कचरागाडी घेण्यात आली. नागरिकांना कचरा जमा करण्याकरिता प्लास्टिकच्या बादल्याही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, घरोघरी फिरून कचरा जमा करण्याची मोहीम गावात ठप्प झाली आहे. गावात कचरागाडी असूनही कचरा जमा करण्यासाठी घरोघरी फिरत नाही. मग कचरागाडी कशासाठी, असा सवालही नागरिक करीत आहेत. सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या बस्तवाड गावातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. परिणामी रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निदर्शनास येत आहेत.
दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना धोका
कचऱ्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असल्याची माहिती काही पालकांनी दिली. हलगा गावातील कचरागाडी रोज घरोघरी फिरून कचरा जमा करते. मात्र बस्तवाड येथील कचरागाडी एकाच ठिकाणी थांबून आहे. कचरागाडीची ही योजना बंद का आहे? याची ग्रा.पं. सदस्य चौकशी कधी करणार, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
गावचा विकास झाला, पण कचरा तेथेच
अलीकडच्या चार-पाच वर्षात बस्तवाड गावाचा विकास झपाट्याने होऊ लागला आहे. मात्र कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रा.पं. पुढाकार घेत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.









