प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील स्वच्छता कामाकडे दुर्लक्ष झाले असून ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. कॅम्प परिसरात एका हॉटेलशेजारी पाच महिन्यापासून कचऱयाचा ढीग साचला असून कचऱयाची उचल करण्यासाठी अनेक वेळा तक्रार करण्यात आली. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले असून स्वच्छता वेळेवर केली जात नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्वच्छता कर्मचाऱयांकरवी केवळ झाडू मारण्यात येते. पण कचऱयाची उचल केली जात नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कचऱयाला आग लावण्यात येते. अनेक ठिकाणी चार ते पाच दिवस कचऱयाची उचल केली जात नाही. कॅम्प परिसरातील एका हॉटेलजवळ पाच महिन्यापासून कचऱयाची उचल करण्यात आली नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. मिलिटरी फार्म रोडशेजारी कचरा टाकण्यात येऊ नये, असे आवाहन करून कारवाईचा इशारा देणारा फलक लावला आहे. पण याठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून रस्त्याशेजारी जुन्या इमारतीचे साहित्य, चिकन-मटण दुकानामधील कचरा टाकण्यात येत आहे. तसेच कचरावाहू वाहनामधील कचरादेखील याठिकाणी टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत कॅन्टोन्मेंट कोणती कारवाई करणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे.









