वार्ताहर/हलशी
नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याने या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून नंदगड परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राम पंचायतीने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. येत्या चार दिवसात या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून होत आहे. नंदगड, हलशी रस्त्यावरील नाल्यानजीक दोन्ही बाजूला नंदगड ग्राम पंचायतीने गावातील कचरा टाकलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तसेच या रस्त्यावरुन नंदगड, हलशी परिसरातील प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

नंदगड ग्राम पंचायतीला गांधी स्वच्छता पुरस्कार तीनवेळा मिळालेला आहे. तसेच 15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनी दिल्लीत पंचायत अध्यक्षांचा गौरव करण्यात आला होता. मात्र नंदगड परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याकडे ग्राम पंचायतीचे अधिकारी तसेच संपूर्ण सदस्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नंदगड ग्राम पंचायतीने गावातील कचऱ्यातील योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नंदगडमधील जुने गाव येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूला झाडेझुडपे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे वॉटरमन पाणी पुरवठा करण्यासाठी नकार देत आहे. कारण आजुबाजूला विषारी साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणीपुरवठ्यातील कर्मचारी पाण्याच्या टाकीकडे जाण्यासाठी धजावत असल्याने नंदगड गावातील पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याच्या टाकीच्या परिसरात असलेली झाडे, झुडपे काढून खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.









