उचगाव ग्रामपंचायतने घेतली दखल : प्रवासी-वाहनधारकांतून समाधान
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा गेल्या दोन महिन्यापासून कचऱ्याचे ढिगारे साठविण्यात आले होते. यासंदर्भात ‘तरुण भारत’मधून अनेकवेळा फोटोसह वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवण्यात आला होता. याची दखल उचगाव ग्रामपंचायतने घेऊन सदर ठिकाण व हा परिसर स्वच्छ केल्यामुळे प्रवासी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्तावर या भागातील नागरिकांतून घरातील अनेक टाकाऊ पदार्थ, केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
याची दखल घेऊन उचगाव ग्रामपंचायतच्या वतीने घेऊन शुक्रवारी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य यादो कांबळे, बंटी पावशे, एल. डी. चौगुले, गजानन नाईक, माजी अध्यक्ष जावेद जमादार, शशी जाधव आदी सदस्यांनी सकाळी नऊपासून दोन वाजेपर्यंत संपूर्ण कचरा स्वच्छ करून तो ट्रॅक्टरमध्ये भरून तुरमुरी कचरा डेपोला पाठविला. तसेच सदर रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ केला. तसेच सदर भागात कोणीही कचरा टाकू नये, टाकताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचा सूचना फलक या ठिकाणी आता लावला आहे. तसेच ही जागा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे बाळकृष्ण तेरसे यांनी सांगितले.









