बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर उभारले सूचनाफलक
वार्ताहर /उचगाव
उचगावनजीक बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा अनेक नागरिकांनी टाकलेला केरकचरा उचगाव ग्रामपंचायतने याची दखल घेऊन सदर जागेची साफसफाई करण्यात आली. व सदर जागी कोणीही कचरा टाकू नये, असे ग्रामपंचायतीच्या वतीने फलक लावण्यात आला आहे. सदर ठिकाण हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधीन असून सदर जागी कोणीही कचरा टाकल्यास ग्रा. पं. मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आल्याची माहिती ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांनी दिली. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी आपल्या घरातील केरकचरा टाकाऊ पदार्थ टाकून ढिगारे साचले होते. सदर ठिकाण हे धोकादायक बनले होते. कचऱ्याच्या या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधीही पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता. यासाठी ग्रा. पं.ने तातडीने याबाबत निर्णय घेऊन कचऱ्याचे ढिगारे हलवून हा परिसर स्वच्छ केला. आणि या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये. टाकल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशाप्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच सदर संपूर्ण मार्ग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असल्याने कोणीही कचरा टाकतेवेळी आढळल्यास त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रा. पं.ने ठरविले आहे.









