बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीकची दुर्घटना : सुदैवाने मोठा अनर्थ टळला
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाटा (गणेश दूध संकलन केंद्र) या ठिकाणी कचरावाहू गाडीचे ब्रेक फेल झाल्याने सदर डंपरने विद्युतखांबाला धडक देऊन शेतवडीत घुसला. नशीब बलवत्तर म्हणून कोणाला धोका झाला नाही. सदर घटना सोमवार दि. 26 रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली.
अधिक माहिती अशी की, बेळगुंदी फाटा बेळगाव-वेंगुर्ले या मार्गाच्या फाट्यावरती सातत्याने अपघाताची मालिका घडत असते. सोमवारी सायंकाळी कचरावाहू डंपर तुरमुरी कचरा डेपोकडे जात असताना बेनकनहळ्ळीमार्गे येऊन बेळगाव-वेंगुर्ला मार्गाकडे येत असताना ब्रेक फेल झाल्याचे डंपरचालकाने सांगितले. त्यामुळे सदर डंपर विद्युतखांबाला जोरदार धडक देऊन शेतवडीत घुसला.
या घटनेवेळी जर इतर वाहने असती तर मोठा अपघात घडून जीवितहानीही झाली असती. मात्र नशिब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम खात्याला आतातरी जाग यावी आणि तातडीने गतिरोधक घालावे. अन्यथा बेळगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा भागातील प्रवासी आणि नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही बेनकनहळ्ळी येथील धान्य कोठारामध्ये ये-जा करणाऱ्या ट्रकने विद्युतखांबाला धडक दिल्याने पाच ते सहावेळा विद्युतखांब मोडून, वायर तुटून हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी हेस्कॉमचे उचगाव विभागाचे सेक्शन ऑफिसर कांबळे, अमरोळकर व इतर कर्मचारी विद्युतपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते.









