रामघाट रोडशेजारील प्रकार : लक्ष्मीनगर परिसरात कचऱयाचे ढिगारे
प्रतिनिधी /बेळगाव
शहराभोवती असलेल्या विविध उपनगरांमधील रस्त्यांशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असून स्वच्छता करण्याकडे ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. हिंडलगा ग्रा. पं. हद्दीत येणाऱया डिफेन्स कॉलनीजवळील कचरा हटवून सुशोभिकरण करण्यात आले. मात्र, कचरा टाकणाऱयांनी लक्ष्मीनगर परिसरात रामघाट रोडशेजारी कचरा टाकण्यास प्रारंभ केला आहे. परिणामी या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने याबाबत उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
मनपा हद्दीलगत बेनकनहळ्ळी ग्रा. पं. हद्दीतील सरस्वतीनगर, हिंडलगा ग्रा. पं. हद्दीतील डिफेन्स कॉलनी, कंग्राळी ग्रा. पं. हद्दीमध्ये येणारे रामनगर, पिरनवाडी ग्रा. पं. हद्दीतील ब्रह्मनगर, पिरनवाडी अशी असंख्य उपनगरे आहेत. ग्राम पंचायतींकडे निधी नसल्याने उपनगरांचा विकास करण्यास अपयश आले आहे. विशेषतः शहरापासून जवळच असलेल्या उपनगरांमध्ये कचऱयाचे ढिगारे आणि गटारींअभावी सांडपाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लक्ष्मीनगर परिसरात कचऱयाची उचल केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत.
डिफेन्स कॉलनीचा परिसर हिंडलगा ग्रा. पं. हद्दीत येतो. परिसरातील कचरा रामघाट रोडवर डिफेन्स कॉलनी परिसरात टाकण्यात येत होता. त्यामुळे कचऱयाची उचल केल्यानंतरही नागरिक कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करीत होते. त्यामुळे हिंडलगा ग्रा. पं.ने हा परिसर स्वच्छ करून सुशोभिकरण केले, तसेच कचरा टाकण्यात येणाऱया ठिकाणी फलक लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे डिफेन्स कॉलनीशेजारी कचरा टाकण्याचे बंद झाले. पण लक्ष्मीनगर परिसरात असलेल्या खुल्या जागेशेजारी कचरा टाकण्यात येत आहे. हायस्ट्रीट परिसरात रामघाट रोडशेजारी कचरा टाकण्यात आल्यामुळे कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित ग्रा. पं., तालुका व जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे.
या ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक लावून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पण कारवाई करण्यात येत नसल्याने कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील कचरा हटवून स्वच्छतेसाठी ठोस उपायायोजना राबवाव्यात. कचरा टाकणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.









