कचरा हटविण्याची स्थानिकांची मागणी
मडगाव : आकें-मडगाव येथील कॉस्ता पॅक्टरीच्या मागील बाजूला असलेल्या मैदानावरील कचऱ्याच्या ढिगाला आग लागण्याची घटना शनिवारी रात्री घडली. या आगीवर मडगाव अग्नीशमन दलाने नियंत्रण आले. येथील कचरा हटविण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी वारंवार करून देखील तो हटविला जात नव्हता. या कचऱ्याला शनिवारी रात्री आग लागली. येथील कचरा त्वरित हटवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मडगाव पालिकेकडे केली असून हा कचरा आठवडाभरात हटविला नाही तर नागरिकच पुढील भूमिका घेतील असा इशारा देण्यात आला आहे. मडगाव नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार वाढलेले आहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आकें येथील कॉस्ता पॅक्टरीच्या मागील भागात मैदानाच्या बाजूला कचऱ्याचा ढीगाला आग लागली. या कचऱ्यात नारळाच्या सोडणांसह हॉटेलमधील कचरा असा मिश्र्र कचरा होता.









