बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर कचराच कचरा
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर महात्मा गांधी चौक ते सेंट झेविअर्स शाळेपर्यंत रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचऱ्याची ढीग निर्माण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. याबाबत मनपा आणि कॅन्टोन्मेंट प्रशासन उदासिन असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे हा परिसर कचरा डेपोत रुपांतरित होऊ लागला आहे. या मार्गावर जागोजागी मातीचे ढिगारे, घरगुती साहित्य, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ खाद्यपदार्थ देखील टाकले जात आहेत. दरम्यान, त्यावर ताव मारण्यासाठी भटकी जनावरे आणि कुत्री तुटून पडत आहेत. त्यामुळे भटक्या जनावरांचा आणि कुत्र्यांचादेखील कळप वावरताना दिसत आहे. विशेषत: रस्त्यावर कचरा साचून असल्याने सौंदर्यालाही बाधा येऊ लागली आहे. पश्चिम भागातील प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या वेंगुर्ला मार्गावर स्वच्छतेपेक्षा अस्वच्छतेचेच साम्राज्य दिसून येत आहे.
कचरा उचल करणाऱ्या वाहनांनीच डम्पिंग केल्याचा संशय
कचरा उचल करणाऱ्या वाहनांनीच या ठिकाणी डम्पिंग केल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. तुरमुरी अभावी या ठिकाणीच पूर्ण कचरा टाकण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता दुतर्फा कचऱ्याने भरला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाक मुठीत धरूनच वाहने हाकावी लागत आहेत. रस्त्याला लागून मिलिटरी एरिया आहे. मात्र मिलिटरी प्रशासनाचेदेखील दुर्लक्ष झाल्याने रस्त्याच्या दुर्दशेत वाढ होऊ लागली आहे. यावर आळा घालण्यासाठी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे आवश्यक आहे.
परिसर स्वच्छतेची मागणी
या मार्गावर सौंदर्य वाढविण्यासाठी महात्मा गांधींचा पुतळा उभारून सुशोभिकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला मिलिटरी एरिया असल्याने स्वच्छतेचे पालन केले जाते. रस्त्याच्या दुतर्फा मात्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले जात आहे. त्यामुळे मिलिटरी एरिया स्वच्छ व बाहेर रस्ता मात्र कचऱ्याने गच्च झाला आहे. येथील कचऱ्याची तातडीने उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.









