भाग्यनगर परिसरातील जनतेतून तीव्र संताप : महापालिका लक्ष देणार का?
बेळगाव : ऐन दिवाळीतच काही भागातील कचऱ्याची उचल थांबल्याने शहरातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून घंटागाडी आलीच नाही. त्यामुळे घरातच कचरा ठेवावा लागला आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून कचऱ्याची उचल वेळेत करावी, अशी मागणी होत आहे. भाग्यनगर परिसरातील कचरा उचल करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सफाई कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे घरातच कचरा साठवून ठेवावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचणार आहेत. तेव्हा महापालिकेने तातडीने कचरा उचल व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याकडे जनतेचे प्रयत्न सुरू असताना घरातील कचरा नेण्यासाठी कोणीच आले नाही. याबाबत काही सफाई कर्मचाऱ्यांना विचारले असता वेतन मिळाले नाही. त्यामुळे कचऱ्याची उचल करण्यास कोणीही आले नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच काही कर्मचाऱ्यांचे वेतन दिल्याचे साहाय्यक अभियंत्यांनी स्पष्ट केले होते. असे असताना या परिसरातील कचरा उचल झाला नाही.
शहरात इतर भागातही समस्या
भाग्यनगरसह इतर परिसरातही कचऱ्याची उचल झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून विघटन करण्याकडे प्रयत्न सुरू असताना कचरा उचल करण्यासाठीच वाहने आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी कचरा गोळा करण्यासाठी फिरणारी घंटागाडीही बंद झाली आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून मनपा आयुक्त दुडगुंटी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









