अनेक दिवसापासून कचरा पडून असलेल्या परिसराची स्वच्छता : नागरिकांना दिलासा
बेळगाव : यंदेखूट येथील बोळामध्ये कित्येक दिवसापासून पडून असलेल्या कचऱ्याची उचल मनपाच्या स्वच्छता विभागाने केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येथील मार्गावर कचऱ्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ये-जा करणे देखील मुश्किल झाले होते. अखेर मनपाच्या स्वच्छता विभागाला जाग आली अन् कचऱ्याची उचल केली. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने कचरा समस्या गंभीर बनू लागली आहे. कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने जागोजागी ढीग जमा होऊ लागले आहेत. मनपाचे मनुष्यबळ देखील या कामी कमी पडू लागले आहे. त्यामुळे कचरा समस्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. परिणामी काही ठिकाणी दोन तीन महिन्यानंतर कचऱ्याची उचल होऊ लागली आहे.
काही दिवसांपासून झाले होते दुर्लक्ष
शहरातील विविध रस्ते, सिग्नल आणि चौकांमध्ये कचरा पडून आहे. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि पानांचीदेखील समस्या बनू लागली आहे. काही रस्त्यावर झाडांचा कचरा देखील अधिक दिसू लागला आहे. यंदेखूट येथील बोळात झाडांच्या फांद्या आणि इतर कचरा साचून होता. मागील काही दिवसांपासून याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे ये-जा करतानादेखील अडचणी निर्माण होत होत्या. अखेर मनपाच्या स्वच्छता विभागाने काम हाती घेतले. अन् परिसराची स्वच्छता झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
वाढता कचरा मनपाला डोकेदुखी
निवडणुकीनंतर शहरात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरगुती, हॉटेल आणि इतर कचराही वाढला आहे. निवडणुकीतील कचऱ्याची त्यात भर पडली आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. अशा परिस्थितीतही जागोजागी असलेला कचरा उचलला जात आहे. मात्र शहरातील वाढता कचरा मनपासाठीदेखील डोकेदुखी ठरताना दिसत आहे.









